अनुवादाचे पारंपारिक स्वरूप आणि कालानुरुप बदलाची गरज

अनुवादाचे पारंपारिक स्वरूप आणि कालानुरुप बदलाची गरज

“सध्या भारतामध्ये किंवा अन्य देशांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याकरिता, तसेच स्वतःची उत्पादने/सेवांच्या विक्रीसाठी परदेशी कंपन्यांची भारतीय किंवा इतर बहुराष्ट्रीय भाषांमध्ये अनुवाद करवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा होताना दिसते, आणि म्हणूनच की काय बऱ्याच प्रथितयश बहुराष्ट्रीय विदेशी कंपन्यांच्या वेबसाइट्सवर बहुतांशी भारतीय भाषांचे पर्याय आता दिमाखाने झळकताना दिसतात. थोडक्यात, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुवाद हे व्यवसाय आणि व्यावसायिक वृद्धीच्या दिशेने जाणीवपूर्वक उचललेले अतिशय योग्य पाउल आहे असे मी नक्कीच म्हणेन. आज इंटरनेटमुळे जग जवळ येत चालले आहे तर चपखल अनुवादामुळे विविध देश/प्रदेश आणि प्रांतांमधील लोकांचे परस्परांमधील हितसंबंध दृढ होत चालले आहेत.

वरील मुद्द्याच्या अनुशंघाने मी असे म्हणेन की अलीकडच्या काही वर्षांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खुद्द भारतीय तसेच विदेशी कंपन्यांच्या वेबसाइट्स, विविध प्रकारची नवीन ॲप्लीकेशन्स (Apps), कॅमेरा, ब्रँडेड कार्स, वॉशिंग-मशीन्ससारख्या असंख्य प्रॉडक्ट्सची युजर मॅन्युअल्स/गाईड्स अशा सर्व गोष्टी प्रामुख्याने इंग्रजीमधून “मल्टीलिन्ग्वल” होताना दिसून येतात, आणि अशावेळी लिखित मजकुराचे “स्थानिकीकरण (localization)” करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम गरज निर्माण होते ती एका “उत्तम अनुवादकाची”!!

“बहुतांशी वेळा लोक “Translation Field” ला अत्यंत “कॅज्युअली” घेताना दिसतात. “त्यात काय अवघड आहे, सोपे तर असते” असे ठामपणे बोलताना एक पोकळ आत्मविश्वास किंवा अति-आत्मविश्वास असे मी म्हणेन, लोकांच्या “टोनमध्ये” दिसून येतो. पण मला विचाराल तर अनुवाद करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण काम आहे कारण अनुवाद करताना तुम्हाला अवगत असलेल्या दोन्ही भाषांचा “कस” लावावा लागतो. एखाद्या भाषेत होणाऱ्या सृजनात्मक अविष्कारांमुळे ती भाषा जिवंत राहते, तर अनुवादामुळे ती अधिक समृद्ध होते असे म्हटले जाते.

मी स्वतः जपानी तसेच मराठी अनुवाद क्षेत्रामध्ये गेले काही वर्षे सक्रिय/ कार्यरत असल्याने कालानुरूप बदलत चाललेल्या अनुवाद तसेच भाषांतर क्षेत्रातील “ट्रेंड” नक्कीच लक्षात येण्यासारखा आहे.

सुरुवातीला या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांच्या मराठी वेबसाइट्स अभ्यास म्हणून वाचनात आल्या. हे करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या ठराविक संज्ञा! जसे की टेक्निकल किंवा युजर इंटरफेस डोमेनमध्ये support म्हणजे समर्थन, access म्हणजे प्रवेश, customize म्हणजे सानुकूल, install म्हणजे स्थापना/प्रस्थापना इत्यादी. अनुवाद करताना काही काही ठिकाणी हाच साचेबद्ध पॅटर्न अजूनही वापरला जातो, ज्याला मी “पारंपारिक अनुवाद पद्धती” असे म्हणेन. पण एकीकडे अगदी काही ठिकाणी आता अशा “पठडीमधल्या” शब्दांचा हळू हळू फेरविचार होताना दिसतो किंवा तो तसा दिसला पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटते. उदाहरणार्थ, “File format not supported on this device” असे वाक्य असेल तर “फाईल फॉरमॅट या उपकरणावर समर्थित नाही” असा त्याचा पारंपारिक अनुवाद होईल. पण आता, “समर्थित” म्हणजे काय? मूळ शब्द आहे “समर्थन”, मग “मंत्र्याने नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन केले”, “उमेदवाराला हवे तसे समर्थन मिळाले नाही” अशा वेळी “समर्थन” म्हणजे पाठींबा, आधार अशा अर्थाने जास्त करून वापरला जातो असे दिसते. अशा वेळी, “फाईल फॉरमॅट या उपकरणावर चालत (रन होत) नाही” असे म्हणल्यास ते जास्त लॉजिकल ठरू शकते. तसेच “Access image gallery” म्हणजेच “प्रतिमा गॅलरीमध्ये प्रवेश करा” असे पारंपारिक पद्धतीने लिहिल्यास अगदी पहिला अर्थबोध काय होतो? तर, एखादी प्रतिमेची गॅलरी आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रवेश करा, आत जा वगैरे. पण असे खरेच आहे का? नाही. मग अशा वेळी “प्रतिमेची गॅलरी पहा/उघडा” (means see or open an image gallery) असे लिहिल्यास ते समजायला जास्त सोपे होईल. “Install switch on a board” यासाठी “बोर्डवर स्विच प्रस्थापित करा” असे काहीसे क्लिष्ट लिहिण्यापेक्षा “बोर्डवर स्विच बसवा” असे सोपे करून लिहिल्यास वापरकर्त्याला/वाचकाला ते समजणे जास्त सोपे होईल, नाही का? वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना शब्दाला शब्द जोडणे हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्य आणि अनुवादित केलेल्या वाक्यामध्ये भावार्थाचा ऱ्हास होऊ शकतो. उदाहरणार्थ “I will catch you soon” – “मी तुला लवकरच पकडेन” असे अनुवादित केल्यास त्या मूळ वाक्याचा अर्थ लय पावेल. “मी लवकरच तुझ्याशी संपर्क साधेन” असे लिहिल्यास त्याचा अर्थ योग्य प्रकारे व्यक्त होईल. असेच मार्केटिंग डोमेनचे एक साधे उदाहरण पाहू. “We love coffee!!” अशी एखाद्या वेबसाइटची टॅगलाइन असेल तर “आम्हाला कॉफी आवडते!” असे सरळ साधे लिहिण्यापेक्षा “कॉफी म्हणजे आमचा जीव की प्राण!” असे अनुवादित केल्यास वाचकाच्या मनावर त्याचा नक्कीच जास्त प्रभाव पडेल यात शंका नाही. अनुवादात मूळ लेखनाचे शब्दशः रुपांतर न करता त्यातला मतितार्थ समजून घेणे, त्यातील सौंदर्यस्थळे, बारकावे जाणून घेवून ती योग्य प्रकारे लेटेस्ट लँग्वेज ट्रेंड्स लक्षात घेऊन, तसेच आवश्यक त्या ठिकाणी अतिरक्त संदर्भ समाविष्ट करून अनुवादात उतरवणे आवश्यक असते. उदा. “You’ve seen all new shopping emails” याचा “आपण सर्व नवीन शॉपिंग ईमेल्स पाहिले आहेत” असा अनुवाद होईल, जो वरकरणी बरोबर असेलही, पण इथे “शॉपिंग ईमेल्स” याला तसा काहीच अर्थ नाही, तर याठिकाणी emails “related to” shopping असा अर्थ अभिप्रेत आहे. “शॉपिंग संदर्भातील सर्व नवीन ईमेल्स तुम्ही पाहिले आहेत.” या वाक्याने जास्त अर्थबोध होतो आणि म्हणून त्या त्या भाषेच्या आवश्यकतेनुसार आपण बारकाईने विचार केल्यास ते समजण्यास अधिक सोपे होईल. इंग्रजी भाषेमधे एकच शब्द अनेक अर्थानी वापरला जातो आणि भारतीय भाषांमधे प्रत्येक प्रकारच्या भाव-भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे-विशिष्ठ शब्द उपलब्ध असल्याने वापरात आहेत. यासाठी ठराविक कार्यक्षेत्रामधील सखोल ज्ञान (Domain knowledge), त्यासाठी वापरला जाणारा विशिष्ट शब्दसंग्रह (Terminology), लक्ष्यित वाचकवर्ग (Targeted audience), अभिव्यक्ती (Expression) या मुख्य घटकांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.

“Hey, let’s hangout, chillax mom!, you mad at me?, LOL अशा प्रकारचे भाष्य केले जाणाऱ्या किंवा केवळ एका इमोजीवरून (😊🙁😐) भावना पोहोचवू शकणाऱ्या सध्याच्या “इन्स्टंट” युगामध्ये अशा प्रकारच्या आशयाचा अनुवाद करताना कोणत्याही भाषेला (सोर्स आणि टार्गेट) कुठेतरी दुय्यम तर लेखले जात नाही आहे नं?, त्यामधील गर्भितार्थाला धक्का पोहोचत नाही आहे नं? किंवा या सर्व “trendy content” चा अगदी “on the go” अनुवाद करताना सुद्धा अर्थाचा अनर्थ किंवा अर्थलोप तर होत नाही आहे नं? याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

अनुवाद क्षेत्राची वाढत जाणारी व्याप्ती पाहता, समजण्यास अगदी सोप्या अशा अनुवादाचा नवा पायंडा पाडणे कालानुरूप जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कोणत्याही भाषेचे महत्त्व अबाधीत राहणे आवश्यक आहे, नाही का?

संपदा पाध्ये | फिडेल सॉफ्टेक

Ref. No – FLB06221031

Contact Us

Are you looking for Language Services? Fill form for quick contact.