लेखाकार ते अनुवादक एक अनपेक्षित व्यावसायिक प्रवास…!
“लेखाचे शीर्षक वाचूनच कदाचित वाचकांना वाटेल, की एखाद्याला स्वतःच्याच व्यावसायिक जीवनाचा प्रवास असा “अनपेक्षित” वगैरे कसा काय वाटू शकतो? पण या प्रश्नासाठी माझे उत्तर “होय, नक्कीच वाटू शकतो” असे आहे, कारण मला स्वतःला अगदी खरोखरच कल्पना नव्हती, की मी पुढे जाऊन लेखाकार (अकाउंट्स) क्षेत्रामधून बाहेर पडून अनुवाद क्षेत्रामध्ये काहीतरी योगदान देऊ शकेन!
मी “टिपिकल पुणेकर” असल्याने माझे सर्व शिक्षण हे पुण्यामध्येच झाले. त्यामुळे पूर्वीच्या अगदी “साचेबद्ध करीयर ऑप्शन्स”नुसार दहावीनंतर गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशनच्या बरोबरीने काही बेसिक कंप्युटर कोर्सेस केले. त्यानंतर एक-दोन स्मॉलस्केल कंपन्यांमध्ये कनिष्ठ लेखाकर (ज्युनियर अकाउंटंट) म्हणून काम करता करता “लग्नाचा योग” अनपेक्षितपणे नको इतका लवकर आला आणि फारसा विचार करण्याचे माझे ते वय देखील नसल्याने आई-बाबांच्या प्रेमळ आणि काहीशा आग्रही सल्ल्यानुसार माझे “दोनाचे चार” कधी झाले, माझे मलाच कळले नाही!
लग्नानंतर देखील काही काळ, मी लेखाकार (अकाउंटंट),कार्यालयीन प्रशासक (ऑफिस ॲडमीन) अशा स्वरूपाचे जॉब्ज करत होते, आणि ते करत असतानाच कालांतराने मातृत्वाची चाहूल लागली आणि डिलेव्हरी डेटच्या शेवटच्या महिन्यामध्ये मी नोकरीमधून पूर्ण बाहेर पडले. परमेश्वर कृपेने विनाक्लेश डिलेव्हरी झाली आणि बाळाच्या संगोपनामध्ये माझा दिवस कसा सरू लागला काही समजेनासे झाले. पोर्णिमेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो त्याप्रमाणे हळू हळू लहान बाळाची पाउले घरभर फिरू लागली. बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत असूनही पाळणाघरामध्ये किंवा घरी येऊन सांभाळणाऱ्या कोणा अनोळखी मावशीच्या हाती त्याला सोपवून नोकरी करण्याचा पुन्हा विचार करण्यास माझा जीव धजवेना! अथर्व, माझा मुलगा वर्षाचा झाल्यावर माझ्या घरचे मला म्हणाले “तुला हवे तर एखदा शोर्ट कोर्स कर, किंवा आवडेल ते शिक जेणेकरून अर्थवला एकसारखी तुझी सवय लागायला नको, तो आईवेडा व्हायला नको आणि तुला देखील त्या निमित्ताने थोडे घराबाहेर पडता येईल.” मला त्यांचा हा विचार एकदमच पटला आणि मी आपल्याला काय करता येईल? याची विचारचक्रे मनामध्ये फिरू लागली.
B.Com झाले आहे मग M.Com करू का? एखादा ॲडव्हांस कम्प्युटरचा कोर्स करू? का संस्कृतमध्ये पुढे काहीतरी शिकू? का शास्त्रीय संगीत शिकणं पुढे चालू ठेऊ? हे आणि असे असंख्य पर्याय डोळ्यांसमोर नाचायला लागले. पण अचानक एके दिवशी एक वेगळाच विचार मनामध्ये डोकावला “जपानी भाषा शिकावी का?” त्याला कारणही तसेच होते. माझ्या एका मित्राने मी कॉलेजमध्ये असताना मला हीरागाना/काताकाना आणि काही बेसिक 5/10 कांजी शिकवल्या होत्या. मला तेव्हा ती भाषा खूपच interesting वाटली. एका चित्र (कांजी) म्हणजे 1 शब्द!! फारच गंमत वाटायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अथर्वच्या दृष्टीने कोर्सची वेळ अगदीच योग्य होती, आठवड्यातून 3 दिवस आणि 2 तास! मग काय, पुणे युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या रानडे इन्स्टीट्युटमध्ये जाऊन ॲडमिशन घेतली आणि आयुष्याच्या एका नव्या वळणावर एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली! पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड आणि बैठक असल्यामुळे सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हांस डिप्लोमा चांगल्या मार्क्सने पास होत, साइड-बाय-साइड जपानी भाषेच्या प्राविण्य परीक्षांच्या (JLPT) काही लेव्हल्स देखील चांगल्या मार्क्सने पास झाले. एक वेगळेच समाधान मिळाले होते मला तेव्हा! डेबिट, क्रेडीट आणि अखंड आकडेमोडीच्या मर्यादित क्षेत्रामध्ये राहणारी मी, भाषेच्या अमर्याद, अनंत अशा आकाशात कधी येऊन पोहोचले कळलेच नाही! आज मागे वळून पाहताना मला समाधान वाटते की भले मी 5 वर्षे नोकरीचा विचारही केला नाही पण या निर्णयामुळे माझे कोणतेही नुकसान झाले नाही. उलट, जेव्हा माझ्या मुलाला एक “आई” म्हणून माझी खरोखरच गरज होती तेव्हा मी त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकले आणि कालांतराने नोकरी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एक “अनुवादक” म्हणून नवे दालन माझ्यासाठी खुले झाले. अथर्व पहिलीमध्ये गेला, शाळा पूर्ण वेळ सुरू झाली आणि मी जपानी-इंग्रजी अनुवादक म्हणून एका स्मॉलस्केल कंपनीमध्ये 8 तासांच्या फुलटाइम जॉबला पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या उमेदीने सुरुवात केली. कामाचा पहिला प्रत्यक्ष अनुभव म्हणजे तारेवरची कसरतच होती. काहीच सुचत नव्हते. अचूक शब्दाची निवड, वाक्यरचना या मूलभूत गोष्टींपासूनच गोंधळाला सुरुवात! कालांतराने या नवीन क्षेत्रामधील पहिल्याच कंपनीमध्ये थोडाफार जम बसत असतानाच अंदाजे दोन वर्षानंतर मला फिडेल सॉफ्टेक या बहुभाषांमध्ये स्थानिकीकरण करणाऱ्या कंपनीचा कॉल आला आणि आज मी सुमारे 14 वर्षे या ठिकाणी कार्यरत आहे. सुरुवातीची काही वर्षे मी जपानी–इंग्रजी अनुवादक म्हणून काम केले आणि गेली 6/7 वर्षे मी इंग्रजी–मराठी अनुवादक म्हणून यशस्वीपणे काम पाहते आहे. कंपनीमध्ये कार्यरत असताना काही तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अनुवाद करताना अगदी स्त्रोत वाक्य (source sentence) कसे वाचावे, कसे समजून घ्यावे, ते अनुवादामध्ये उतरविताना आशयपूर्ण अनुवाद कसा करावा किंवा तो कसा असावा यातील बारकावे कळू लागले आणि एक एक कोडं हळू हळू सुटायला लागलं, खरेतर अजुनही ते पूर्ण सुटलेलं नाहीच! 🙂 म्हणूनच वाटतं, चपखल अनुवाद करता येणं ही देखील एक “कला” आहे असं म्हणतात ते काही उगाच नाही, कारण ती सर्वांनाच “सहजसाध्य” होते असे नाही.
एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करताना त्या भाषेशी झालेली घट्ट मैत्री, प्रत्येक भाषेचा वेगळा थाट, वेगळा बाज समजून घेताना आणि तो प्रयत्नपूर्वक, अर्थपूर्ण पद्धतीने कागदावर उतरवताना खरोखरच मजा येते. कधी कधी तर एकेका स्त्रोत शब्दासाठी त्याच्या विषयानुरूप लक्ष्यित अर्थ शोधताना अगदी नाकी नऊ देखील येतात. अवांतर वाचन, अनुवादामध्ये कालानुरूप होत असलेले बदल, विविध अवांतर विषयांचा अभ्यास करता करता “Debit what comes in & credit what goes out“ पासून सुरू झालेला माझा हा व्यावसायिक प्रवास “अमृतातेही पैजा जिंके” अशा मराठी भाषेच्या आशयानुवर्ती अनुवादावर येऊन स्थिरावलेला आहे, असे मी नक्कीच म्हणेन!”
संपदा पाध्ये | मराठी अनुवादक
Ref. No – FLB06221032
Contact Us
Are you looking for Language Services? Fill form for quick contact.